मा. ना. श्री अतुलजी सावे यांचा संदेश माननीय मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, नांदेड जिल्हा
मा. ना. श्री अतुलजी सावे यांचा संदेश
माननीय मंत्री, महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री, नांदेड जिल्हा
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट (SHG) आणि कृषी उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा नांदेड कृषी महोत्सव हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते, विविध कृषी उद्योगांशी संवाद साधण्याची संधी मिळते आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळविण्याचे मार्ग खुलतात.
कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद घडवून आणणे तसेच ग्रामीण उत्पादकांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे. नांदेड कृषी महोत्सव हा उपक्रम याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत असून, जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देणारा ठरेल, असा मला विश्वास आहे.
याचबरोबर, प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी उद्योजकांना दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने www.NandedKrushiMahotsav.in हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही अभिनंदनीय आहे. या माध्यमातून ग्रामीण उत्पादकांना वर्षभर आपल्या उत्पादनांची माहिती अधिक व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळेल.
नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी, महिला बचत गट, कृषी उद्योजक आणि नागरिकांनी या कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतो. अशा उपक्रमांमुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अधिक बळकट होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितच नवी गती मिळेल.
नांदेड कृषी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभाग, संस्था आणि सहभागी यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

