मा. दत्तकुमार काळसायत , मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांचा संदेश
मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांचा संदेश
राज्य शासनाच्या धोरणानुसार आयोजित करण्यात येणारा नांदेड कृषी महोत्सव हा तीन दिवसांचा कृषी प्रदर्शन कार्यक्रम शेतकरी, महिला बचत गट (SHG) आणि कृषी उद्योजकांना आपली उत्पादने व तंत्रज्ञान सादर करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी निर्माण होते.
मात्र, प्रदर्शनाचे स्वरूप केवळ तीन दिवसांपुरते मर्यादित न राहता त्यातून निर्माण होणाऱ्या संधी पुढेही सुरू राहाव्यात, या उद्देशाने एक अतिरिक्त आणि अभिनव प्रयत्न म्हणून www.NandedKrushiMahotsav.in हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रदर्शनात सहभागी होणारे शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती वर्षभर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रदर्शनानंतरही त्यांना सतत आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण उत्पादकांना व्यापक बाजारपेठेशी जोडणे ही काळाची गरज आहे. www.NandedKrushiMahotsav.in हे व्यासपीठ शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी उद्योजकांना ग्राहकांशी थेट जोडणारे आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य मूल्य मिळवून देणारे एक प्रभावी माध्यम ठरेल, असा मला विश्वास आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी उद्योजकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळवावी, हीच अपेक्षा.

